चंद्रपूर :- जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने महानगरपालिका अंतर्गत जटपुरा गेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिला तसेच नवजात बाळांच्या मातांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (६ ऑगस्ट) झालेल्या या उपक्रमातून स्तनपानाचे महत्त्व, माता व बालकांचे आरोग्य आणि पौष्टिक आहाराबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती साने यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत यांनी नवजात बालकांसाठी आईच्या दुधाचे महत्त्व, स्तनपानाचे फायदे तसेच माता व बाळाच्या आरोग्यासाठी त्याची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्तनपानाबाबत जनजागृती केली. विद्यार्थिनींनी माता, शिशु संगोपन आणि स्तनपान या विषयांवर तयार केलेले विविध जनजागृतीपर पोस्टर्सही यावेळी प्रदर्शित केले. या पोस्टर्सच्या माध्यमातून भावी माता व महिलांना स्तनपानाचे महत्त्व आणि बालसंगोपनाविषयी आवश्यक माहिती समजावून सांगण्यात आली.
महिलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यक्रमात उपस्थित महिलांना शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जनजागृतीसोबतच महिलांना पौष्टिक आहाराचा संदेशही देण्यात आला.
या उपक्रमाला इनर व्हील क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा रिंकू सुराणा, सचिव भारती छाबरा, क्लब एडिटर कीर्ती केशाटीवार तसेच प्रकल्प निर्देशक व माजी अध्यक्षा राखी बोराडे यांची उपस्थिती होती. स्तनपानाबाबत समाजात अधिकाधिक जनजागृती निर्माण करून माता व बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.