*चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पक्षपाती धोरणाविरोधात नगरसेवक राहुल चौधरी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर मनपाच्या लेखी आश्वासनानंतर मागे*
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अत्यंत भेदभावपूर्ण, पक्षपाती आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित झालेल्या कारवाईविरोधात भानापेठ प्रभागाचे खंबीर नगरसेवक राहुल चौधरी यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचे रणशिंग फुकले होते. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या या अन्यायी कारभाराविरोधात नागरिकांसह विविध पक्षांचे नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मंडपाला सदिच्छा भेट देऊन नगरसेवक राहुल चौधरी यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.
आज मनपा आयुक्त मनपा आयुक्त अकनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, काँग्रेस गटनेते सुरेंद्र अडबाले, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांची उपस्थिती होती. आंदोलन सोडण्यात आले.
नगरसेवक राहुल चौधरी यांच्या घराच्या तथाकथित अवैध बांधकामावर तत्परतेने हातोडा चालवण्यास उत्सुक असलेल्या मनपा प्रशासनाचा दुटप्पी चेहरा उघडा पाडत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. भानापेठ प्रभागातील बगड खिडकी रोड, पी.एच. नगर येथील बंडू पेद्दुलवार यांचे अगरबत्ती गोदाम पूर्णपणे अवैध असून तिथे कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसताना मनपा प्रशासन त्यावर कारवाई करत नव्हते. तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांना पत्र देऊन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या बांधकामांच्या मंजुरीची कागदपत्रे मागितली असता प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. या दुटप्पी कारभाराचा पर्दाफाश करताना चौधरी यांनी २०११-१२ मध्ये बांधलेल्या मनपाच्या स्वतःच्या इमारतीच्या वैधतेवरच सवाल उपस्थित केले होते.
उपोषणस्थळी वाढणारा जनसंपाद आणि सर्वपक्षीय पाठिंबा पाहून अखेर मनपा प्रशासनाला नमते घ्यावे लागले. मनपा उपायुक्त संदीप चिद्रवार यांनी नगरसेवक राहुल चौधरी यांना अधिकृत पत्राद्वारे लेखी आश्वासन दिले. या पत्रात पेद्दुलवार यांच्या अगरबत्ती गोदामाची मोका चौकशी करून ७ दिवसांत मालकी हक्क, मंजूर नकाशे व अग्निशमन विभागाची NOC सादर करण्याची अंतिम नोटीस बजावल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पत्राच्या अनुषंगाने भाजप नगरसेवकांना घराच्या बांधकाम मंजुरीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कागदपत्रे न दिल्यास निष्पक्ष कारवाई करण्याची ठाम हमी प्रशासनाने दिली. याशिवाय नगीनाबाग परिसरातील कथित अतिक्रमणांबाबतही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मनपा प्रशासनाने सर्व तक्रारींची दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्यामुळे नगरसेवक राहुल चौधरी यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.