Congress is a mouthpiece; Chandrapur Mayor is BJP
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षात अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असून भाजपच्या संगिता खांडेकर Mayor Sangita Khandekar यांची महापौरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे असतानाही अंतर्गत कलहामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपने काँग्रेसच्या हातून महापौरपद हिसकावून घेतले आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगिता खांडेकर यांना ३२ मते, तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मते मिळाली. चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ जागा असून सत्ता स्थापनेसाठी ३४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते. मात्र वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला आणि भाजपसाठी संधी निर्माण झाली.
या निवडणुकीत ठाकरे गटाच्या पाठिंब्याने भाजपने सत्ता स्थापन केली. ठाकरे सेनेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला. वडेट्टीवार–धानोरकर गटातील मतभेद विसरून काँग्रेसने महापौरपदासाठी ठाम भूमिका घेत निवडणूक लढवली; मात्र प्रत्यक्ष मतदानात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.
चंद्रपुरात काँग्रेसचे संख्याबळ जास्त असले तरी अंतर्गत वाद आणि गटबाजीचा मोठा फटका पक्षाला बसला. धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील संघर्ष निवडणुकीनंतरही कायम राहिला. सत्तावाटपावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावले होते. दिल्लीतील चर्चेचा निकाल लागण्याआधीच इकडे भाजपने डाव साधत ठाकरे सेनेशी थेट वाटाघाटी करून महापौरपद देण्याची ऑफर दिली आणि सेनेला आपल्या बाजूने वळवले.
या राजकीय घडामोडींमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये जे राज्य पातळीवर घडू शकले नाही, ते चंद्रपूरमध्ये घडले आणि काँग्रेसचा गड ढासळत भाजपचा महापौर विराजमान झाला.
एकूणच, एका मताने बदललेले सत्तासमीकरण, काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि भाजप–ठाकरे गटाची युती — यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे.