Congress holds ‘Raghupati Raghav Rajaram Satyagraha’ protest in Chandrapur against the Ram Mandir donation scam
चंद्रपूर :- राम मंदिर देणगी विवादावरून आणि आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहाराच्या विरोधात चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावाने लूट करणाऱ्यांना सद्बुद्धी यावी, या उद्देशाने येत्या सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता चंद्रपूर येथील ऐतिहासिक अंचलेश्वर मंदिर येथे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या नावावर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची चौकशी व्हावी आणि संबंधितांना सद्बुद्धी मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कमिटीने प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप उपस्थित केले आहेत. भक्तांकडून मोठ्या श्रद्धेने आलेली सुमारे २ कोटी रुपयांची चांदीची देणगी हिशोबात नसून ती बेपत्ता असल्याचा मुख्य आरोप यात करण्यात आला आहे. तसेच या गैरव्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे सुरक्षा फुटेज आणि रेकॉर्ड्स जाणूनबुजून डिलीट किंवा गहाळ करण्यात आले असून पुराव्यांशी थेट छेडछाड केल्याचा दावा केला आहे.
यासोबतच, भक्तांकडून अनेक रोख देणग्या स्वीकारताना त्यांना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, ज्यामुळे एकूण मालमत्तेचा ताळमेळ पूर्णपणे अस्पष्ट झाला आहे. याशिवाय विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थांच्या फायद्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात आल्याचे संशयास्पद जमीन व्यवहारही समोर आले आहेत.
या सर्व आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराच्या मुख्य दाव्यांवर प्रकाश टाकत चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा जाहीर सत्याग्रह करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या पवित्र नावाचा वापर करून चाललेली ही लूट थांबवण्यासाठी आणि या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी काँग्रेसने आक्रमक पाऊल उचलले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
