चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे दोन ट्रकमधून डिस्कसह १७ टायर चोरी केल्याच्या प्रकरणाचा राजुरा पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचे १७ टायर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Rajura Police crack down on an interstate gang of tyre thieves
प्राप्त माहितीनुसार, एसव्हीए ट्रान्सपोर्टिंग कंपनीचे ट्रक क्रमांक CG 22 AK 7982 आणि CG 22 AK 9200 हे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रायपूर येथून कोलफाईन हा माल घेऊन भाटिया कोल वॉशरी, पांढरपौनी (ता. राजुरा) येथे आले होते. माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक लॉयड्स मेटल, राजुरा येथील रेल्वे सायडिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाले.
मात्र, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास दोन्ही ट्रकचालकांचे मोबाईल फोन बंद झाल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, रेल्वे सायडिंगवरील सुरक्षा पर्यवेक्षकांनी ट्रक माल भरण्यासाठी आले नसल्याची माहिती कंपनीला दिली. त्यानंतर जीपीएस लोकेशन तपासले असता ट्रक निर्धारित परिसरातच असल्याचे दिसून आले.
प्रत्यक्ष पाहणी केली असता, दोन्ही ट्रकचे डिस्कसह एकूण १७ टायर चोरी झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये एका ट्रकचे नऊ, तर दुसऱ्या ट्रकचे आठ टायर गायब होते. चोरी झालेल्या टायरची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील चकौडिया परिसरातून रामलाल गिरधारी यादव (वय २७) आणि अजय श्रीकाशी पेटल (वय ३०) दोघेही राहणार मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील रहिवासी असून मजुरीचे काम करतात या दोन संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
१० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे सर्व १७ टायर, किंमत २ लाख ५० हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली MP 18 GA 5867 क्रमांकाची बोलेरो पिकअप, किंमत ७ लाख ५० हजार रुपये, असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेलचे सपोनि झाडोकर व त्यांचे पथक, तसेच राजुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि लक्ष्मण लोकरे, पोउपनि सुनील धांडे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, आकाश पिपरे आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.