Wednesday, October 14, 2026
HomeHealthचिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी बालकांचा मुंबईकडे प्रवास सुरू

चिमुकल्यांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी बालकांचा मुंबईकडे प्रवास सुरू

चंद्रपूर :- लहान मुलांच्या चेहर्यावरील निरागस हास्य हेच त्यांच्या कुटुंबाचे खरे सुख असते. मात्र, जन्मजात हृदयरोगामुळे अनेक चिमुकल्यांच्या आयुष्यावर संकट ओढवते, तर त्यांच्या पालकांनाही आर्थिक अडचणींसह मोठ्या मानसिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशा कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या मोफत हृदयशस्त्रक्रिया उपक्रम अनेकांसाठी आधार ठरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून चंद्रपूर येथे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिरात हृदयाशी संबंधित आजार आढळलेल्या चिमुकल्यांना पुढील उपचारांसाठी आज चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आल आहे तेथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. Children travel to Mumbai for heart surgeries

            आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि मुंबई येथील किम्स रुग्णालय यांच्या सहकार्याने काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे लहान बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासणीदरम्यान हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित आजार आढळलेल्या बालकांवर मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्याच्या उपचारांची चिंता करणार्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

   यापूर्वीही २६८ बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. अनेक बालकांना नव्या आयुष्याची संधी मिळाली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहर्यावर पुन्हा आनंद फुलला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ कोणत्याही बालकावर येऊ नये, या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम आरोग्यसेवेतील सामाजिक बांधिलकीचे महत्त्व दर्शविणारा ठरत आहे.

            आज चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून या चिमुकल्यांनी आपल्या पालकांसह मुंबईकडे प्रवास सुरू केला. यावेळी सुमित बेेले, अरुण तिखे यांच्यासह भारतीय जनता पक्ष महानगरातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चिमुकल्यांना उपचारांसाठी रवाना करताना त्यांच्या चेहर्यावर निरोगी आयुष्याची आशा दिसत होती, तर पालकांच्या डोळ्यांत आपल्या लेकरांनी पुन्हा आनंदाने बागडावे, खेळावे आणि निरोगी आयुष्य जगावे, ही स्वप्ने तरळत होती. या प्रवासात केवळ उपचारांची अपेक्षा नसून, आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकट दूर होऊन नव्या भविष्याची सुरुवात होईल, हा विश्वासही पालकांच्या मनात आहे.

             चिमुकल्यांच्या चेहर्यावरील निरागस हास्य पुन्हा खुलावे, त्यांच्या आयुष्यातील वेदना दूर व्हाव्यात आणि त्यांचे बालपण आनंदाने बहरावे, हीच भावना या उपक्रमामागे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular