चंद्रपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. अभिजितदादा वंजारी यांच्या प्रचारार्थ मातोश्री महाविद्यालय, चंद्रपूर येथे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधून निवडणुकीच्या प्रचाराला गती देणे आणि विजयासाठी संघटनात्मक ताकद एकवटणे, हा या सभेचा मुख्य उद्देश होता. सभेला काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Joint consultative meeting held by Congress and VMS in Chandrapur
यावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी, “अँड. अभिजित वंजारी यांना पुन्हा प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी आपापसातील समन्वय आणि एकजूट कायम ठेवून जोमाने काम करावे,” असे आवाहन केले. पदवीधर मतदारांपर्यंत महाविकास आघाडीची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणे, मतदारांशी सातत्याने संवाद साधणे आणि सर्व संघटनांनी समन्वयाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. Work unitedly for the victory of Adv. Abhijit Vanjari – Subhash Dhote
सभेला पदवीधर आमदार अँड. अभिजितदादा वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ काँग्रेस नेते सूर्यकांत खनके, प्रवीण पडवेकर, भांडेकर जी, महिला शहर जिल्हाध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, माजी महापौर संगीता अमृतकर, सुनीता लोढिया, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अनिल नरुले, राजूजी बनकर, दीपक जेऊरकर, जगदीश जुनघरे, सुरेंद्र अडबाले, हरीश ससनकर, सुनंदा धोबे, संगीता भोयर आणि अनिता चौबे यांचीही उपस्थिती होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट), विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तसेच विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांच्या सहभागामुळे प्रचाराला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
