चंद्रपूर :- पत्ते खेळू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लोखंडी सुरीने पोटात वार करून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला चंद्रपूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. Murder in anger over not being allowed to play cards प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला.
११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे हा प्रकार घडला. मृतकाने आरोपीला पत्ते खेळू दिले नाहीत. याचा राग आल्याने आरोपीने पत्ते खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतप्त आरोपीने लोखंडी सुरीने मृतकाच्या पोटात वार करून त्याचा खून केला.
या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तत्परतेने गुन्हा क्रमांक ५००/२०२२, भारतीय दंड संहिता कलम ३०२ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तपासी अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. Accused gets life imprisonment
साक्षी-पुरावे ग्राह्य ; आरोपी दोषी
सदर खटल्याची सुनावणी चंद्रपूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीमती सीमा रामटेक आणि श्री. पी. जी. घट्टवार यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षी-पुरावे न्यायालयासमोर सादर केले. हे पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.
पोलिसांच्या तपासाला यश
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस ठाणे राजुरा यांनी केला. न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार ललिता शेंडे पोलीस ठाणे राजुरा यांनी काम पाहिले.
सदर दोषसिद्धीची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या समन्वयातून या प्रकरणात न्यायालयीन निकालापर्यंत प्रभावीपणे पाठपुरावा करण्यात आला.
