चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपल्या जीवनाचा ध्यास मानून वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत संघर्ष करणारे त्यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेबांनी दाखविलेल्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या मार्गावर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आयुष्यभर ठामपणे वाटचाल केली. त्यामुळे त्यांचे कार्य आणि विचार आजच्या पिढीसाठीही दिशादर्शक आहेत, असे विचार आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकट केले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बाळु खोब्रागडे, बलराम डोडाणी, तुषार सोम, अजय जयस्वाल, आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या प्रतिमेलासुध्दा मार्लापण करुन अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मानसपुत्र म्हणून राजाभाऊ खोबरागडेे यांनी आंबेडकरी चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बाबासाहेबांच्या विचारांवरील निष्ठा, सामाजिक प्रश्नांची जाण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची त्यांची भूमिका यामुळे ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे आले. बाबासाहेबांनी समाजाला दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा विचार राजाभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनातून प्रत्यक्ष कृतीत आणला, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, वंचितांना सन्मानाने जगता यावे आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी, यासाठी राजाभाऊ खोबरागडेे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची आणि हक्कांसाठी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका ही बाबासाहेबांच्या विचारांचा पुढचा प्रवाह होती. त्यामुळे राजाभाऊंचे कार्य हे केवळ एका नेत्याचे कार्य नसून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण अध्याय आहे, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाचे स्मरण केले.