चंद्रपूर : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जातीय भेदभाव व मानसिक छळाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पक्षाच्या (BSP) वतीने सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निवेदन आंदोलन करण्यात येणार आहे. Conduct an impartial inquiry into the Sahil Wakode case
बसपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील बीटेकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय साहिल वाकोडे यांचा १८ सप्टेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळून आला. साहिलच्या कुटुंबीयांनी त्याला संस्थेच्या परिसरात जातीय भेदभाव, मानसिक त्रास आणि जातिसूचक टिप्पण्यांना सामोरे जावे लागल्याचा आरोप केला आहे. BSP to submit a memorandum of protest on September 28
या प्रकरणात कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रा. सूर्यनारायण दूल्ला आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे बसपकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रा. दूल्ला यांना डीन पदावरून निलंबित करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, परीक्षेदरम्यान साहिलने कथितरीत्या मोबाईल फोन व चॅटजीपीटीचा वापर करून गैरप्रकार केल्याचा दावा करणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या फुटेजच्या आधारे करण्यात येणाऱ्या दाव्यांवर साहिलच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले असून, फुटेज अस्पष्ट असल्याने त्यामध्ये साहिलची ओळख स्पष्ट होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच घटनेपूर्वीच्या कालावधीतील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आल्याचे बसपने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर साहिलच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, कॅम्पसमधील परिस्थिती, जातीय भेदभावाचे आरोप तसेच परीक्षेतील कथित गैरप्रकारासंदर्भातील सर्व बाबींची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बसपकडून करण्यात येत आहे.
देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज असल्याचेही बसपने म्हटले आहे. साहिल वाकोडे प्रकरणाची चौकशी पारदर्शकपणे करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी पक्षाची मागणी आहे.
या आक्रोश निवेदनात बसपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच मानवतावादी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष रत्नाकर साठे यांनी बसपच्या वतीने करण्यात आले आहे.
