चंद्रपूर :- राजुरा येथील बहुचर्चित पापा जाधव हत्याकांडाचा तपास पुढे नेत राजुरा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अंकित बापुजी मासीरकर (वय २४, रा. चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या सहाव्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. Rajura Murder Case
चंद्रपूर पोलीस दलात 14 नवीन वाहने दाखल………
दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास राजुरा येथील प्रदीप बारजवळ पापा जाधव यांच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राजुरा परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात राजुरा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. तपासादरम्यान या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA/MCOCA 1999) अंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली.
यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा कुमार सुशांत (भापोसे) यांनी हाती घेतला. गोपनीय माहिती तसेच तपासातून अंकित बापुजी मासीरकर याचा या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या कालावधीत आरोपीची भूमिका तसेच हत्याकांडातील इतर बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा कुमार सुशांत, पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे (मकोका तपास पथक) तसेच अंमलदार सुरेंद्र काळे, दिनेश वैद्य, रवी तुराणकार, महेश बोलगोडवार आणि भूषण इटनकर यांनी केली.
