नागपूर :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळासोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रश्नांकडे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे गाडी नियोजित वेळेपेक्षा अनेक वेळा उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा बैठकीत विशेषत्वाने उपस्थित करण्यात आला. या गाडीच्या विलंबामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच नियमित प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. त्यामुळे सदर गाडी नियोजित वेळापत्रकानुसार नियमित आणि वेळेत चालविण्यात यावी, अशी मागणी डॉ. किरसान यांनी केली. Run the Gondia-Ballarshah train on schedule
त्याचप्रमाणे गडचिरोली येथे रेल्वे तिकीट काढण्यासाठी सध्या पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या सुविधेबाबतही प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा डॉ. किरसान यांनी मांडला. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने उपलब्ध काउंटरवर तिकीट काढताना अनेकदा अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी गडचिरोली शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमध्येही रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ कमी होऊन नागरिकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी विविध महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना आवश्यक त्या स्थानकांवर थांबे देणे, रेल्वे स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, निवारा यांसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच स्थानकांचा विकास व आधुनिकीकरण करण्याबाबतही मागण्या मांडण्यात आल्या.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील अनेक नागरिक रेल्वे सेवेचा नियमित वापर करतात. त्यामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहणे, तिकीट सुविधा सुलभ होणे आणि स्थानकांवर आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे डॉ. किरसान यांनी बैठकीत नमूद केले. प्रवाशांच्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
बैठकीस खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासह रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार राजेंद्रजी जैन, खासदार मायाताई इवनाते, बालाघाटच्या खासदार भारती पारधी तसेच नागपूर मंडळाच्या कार्यक्षेत्रातील अन्य संसद सदस्य व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
