Hostel for OBC students in Chandrapur to start from August 17 – Minister Sudhir Mungantiwar
मुंबई / चंद्रपूर :- चंद्रपूर येथील ओबीसी, एन. टी. (भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह उर्वरित कामे पूर्ण करून दि. १७ ऑगस्ट पासून सुरू करून तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीची तत्काळ सोडवणूक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात ओबीसी, एन. टी. ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात आज बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ओबीसी सेवा संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, देवा माधव पाचभाई, गोमती पाचभाई यांच्यासह अन्य प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर त्यासाठीचे सुयोग्य वातावरण मिळावे, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था चांगली असली पाहिजे. त्यामुळे तत्काळ वसतिगृहातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याठिकाणी विद्यार्थी प्रवेश सुरु करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
वसतिगृह प्रवेशासाठी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधन नाही. याबाबत विभागाच्या वतीने स्पष्ट कल्पना जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंत विभागाने पोहोचवावी. विद्यार्थ्यांना याबाबत अडचण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी, एन. टी. ( भटक्या जमाती), एसबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना सुरू करावी, ओबीसी विद्यार्थिनी प्रमाणे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात १०० टक्के सवलत मिळावी, विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अनुसूचित जातीसाठी असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात ओबीसी विद्यार्थ्यांचा कोटा कमी करण्यात आलेला नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम विभागाने तत्काळ दूर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. या मुद्द्यांसह ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सर्वच योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने जाहिराती व सोशल मिडियाच्या माध्यमातून मोहिम राबवावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी, मंत्री श्री. सावे म्हणाले की, चंद्रपूर येथील वसतिगृहात फर्निचर सह सर्व सुविधा उपलब्ध करून १७ ऑगस्ट पूर्वी ते सुसज्ज केले जाईल. याशिवाय, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहातही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी, विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने जे धोरणात्मक निर्णय आहेत, ते उच्च स्तर समिती आणि मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेतली जाईल, असे सांगितले.