Monday, May 25, 2026
HomeCrimeगोवंश तस्करांवर चंद्रपूर पोलिसांची ‘मकोका’ची ऐतिहासिक कारवाई

गोवंश तस्करांवर चंद्रपूर पोलिसांची ‘मकोका’ची ऐतिहासिक कारवाई

Chandrapur police’s historic action of ‘Mcoca’ against cattle smugglers

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गोवंश तस्करीच्या संघटित रॅकेटविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी इतिहासातील सर्वात मोठी आणि धडक कारवाई करत कुख्यात तस्कर इम्रान बब्बु शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोवंश तस्करी प्रकरणात मकोका लावण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई ठरल्याने गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. Chandrapur police’s historic action of ‘Mcoca’ against cattle smugglers

दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, मूल-चंद्रपूर मार्गावरून तेलंगणाकडे दोन ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित दोन ट्रक अडवून तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

दोन्ही ट्रकमध्ये तब्बल ६३ गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबण्यात आले होते. जनावरांचे हात-पाय व तोंड घट्ट बांधलेले होते. ट्रकमध्ये चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. अमानुष पद्धतीने करण्यात आलेल्या या वाहतुकीदरम्यान दोन जनावरांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले. आरोपींकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवाने किंवा पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासात आरोपी हे महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात गोवंश कत्तलीसाठी चोरटी वाहतूक करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४१/२०२६ नुसार प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान इम्रान बब्बु शेख व त्याच्या टोळीविरुद्ध यापूर्वीही संघटित गुन्हेगारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला २५ मे २०२६ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींवर मकोकाच्या कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली.

या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्श नात पो.नि. श्री. अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), पो.नि. प्रभावती एकुरके (रामनगर पोलीस स्टेशन), पो.उपनि. सुरेंद्र उपरे (तपास अधिकारी, रामनगर पो.स्टे.), स.फौ. अरुण खारकर (स्थानिक गुन्हे शाखा), पो.हवा. परवरीश शेख (स्थानिक गुन्हे शाखा), पो.हवा. सुधीर मत्ते (स्थानिक गुन्हे शाखा), पो.कॉ. अनिल जमकादम (रामनगर पोलीस स्टेशन) यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

“चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गोवंश तस्करी आणि संघटित गुन्हेगारी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अशा गुन्हेगारांवर यापुढेही मकोका सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई सुरूच राहील,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular