Thursday, September 10, 2026
HomeCrimeअवैध धंद्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांची धडक

अवैध धंद्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांची धडक

चंद्रपूर :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने ऑगस्ट २०२६ मध्ये व्यापक धडक मोहीम राबविली. दारूबंदी, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ, मकोका, रेती चोरी तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३७८ गुन्हे दाखल करून ४५९ आरोपींना अटक करण्यात आली असून, ८० लाख ६८ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Police Crack Down on Illegal Activities

दारू व हातभट्टीवर पोलिसांचा घाव

दारूबंदी कायद्यांतर्गत ३५५ गुन्हे उघडकीस आणून ५० लाख ३१ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हातभट्टी दारूविरोधात पाच कारवाया करत २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जुगार अड्ड्यांवर धडक

जुगार कायद्यांतर्गत ८८ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवायांमध्ये तब्बल १ कोटी ५ लाख ११ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोवंश तस्करीला लगाम

अवैध जनावरांच्या वाहतुकीविरोधात १८ कारवाया करण्यात आल्या. यामध्ये १७९ जनावरांची सुटका करण्यात आली. ३१ वाहनांसह एकूण १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांविरुद्ध ५७ कारवाया

NDPS कायद्यांतर्गत ५७ कारवाया करत १० लाख ४२ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये २० किलो ९९ ग्रॅम गांजा तसेच ४ ग्रॅम ६५० मिलीग्रॅम एम.डी. (MD) यांचा समावेश आहे.

रेती चोरीलाही चाप

अवैध रेती वाहतूक व चोरीच्या ८ प्रकरणांमध्ये तब्बल १ कोटी ५७ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुगंधी तंबाखू विरोधात कारवाई

प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या ११ गुन्ह्यांमध्ये १९ लाख ८६ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच COTPA कायद्यांतर्गत ६९७ प्रकरणांमध्ये १ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अवैध शस्त्रांवर पोलिसांचा वचक

हत्यार कायद्यांतर्गत ९ कारवाया करत ७ लाख ९८ हजार १०० रुपयांची बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली. यात २ भरमार बंदुका, ५ पिस्तूल, २६ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ चाकू आणि १ सत्तूर यांचा समावेश आहे.

सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईलाही वेग दिला. मकोका (MCOCA) अंतर्गत ३ कारवाया, तर ६ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियम तोडणाऱ्यांना १.९० कोटींचा दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ऑगस्ट महिन्यात २२ हजार १०२ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यातून तब्बल १ कोटी ९० लाख ८९ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

यामध्ये विनाहेल्मेट ५,५३३, सीटबेल्ट न लावणे १,१०८, ट्रिपल सीट २,००६, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ५८६, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे २८८, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे ४७, अल्पवयीनांकडून वाहन चालविणे १४, तर मोटार वाहन कायदा कलम १२२ अंतर्गत २,०४६ प्रकरणांचा समावेश आहे.

पोलिसांच्या प्रभावी उपाययोजनांमुळे प्राणघातक अपघातांत ११ ने घट, तर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात २२ ने म्हणजेच ९.१२ टक्क्यांनी घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीच्या गुन्ह्यांची उकल; ७४ लाखांचा ऐवज हस्तगत

चेन स्नॅचिंगच्या ४ गुन्ह्यांची उकल करून १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. घरफोडीचे १२ गुन्हे उघडकीस आणत ४ लाख ८४ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर चोरीच्या ३७ गुन्ह्यांची उकल करून तब्बल ७४ लाख २९ हजार ४६० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यात ३ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या मोटारसायकलींचाही समावेश आहे.

९५ हरविलेल्या व्यक्तींचा शोध

पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून राबविलेल्या विशेष शोधमोहीमेला यश मिळाले. ऑगस्टमध्ये एकूण ९५ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. यात १६ मुली, ५ मुले, ४८ महिला आणि २६ पुरुषांचा समावेश आहे.

न्यायालयीन पैरवीतही यश

पोलीस तपास अधिकारी तसेच पैरवी अधिकाऱ्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ब्रम्हपुरी, नागभीड आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना ऑगस्ट महिन्यात सक्षम शिक्षा सुनावण्यात आली.

अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने दिला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular