चंद्रपूर :- देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी PM Narendra Modi यांच्या ‘मन की बात’मधून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी केवळ विचारांपुरती मर्यादित राहिली नाही, तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी भरीव करण्याची ऊर्जा ठरली. आपण केलेल्या प्रयत्नातून समाजात मोठा बदल घडू शकतो, हा विश्वास ‘मन की बात’ने दिला. याच प्रेरणेतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, बांबू संशोधन आणि रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत चंद्रपूरच्या प्रगतीसाठी काम करता आले, ही माझ्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी केले. ‘मन की बात’च्या १२ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘मन की बात’च्या १३८ भागांचा QR कोड समाविष्ट असलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्यातून प्रेरणा घेत, त्या प्रेरणेचे समाजहिताच्या कृतीत रूपांतर करून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान देणे, हाच या उपक्रमाचा खरा संदेश असल्याची भावना आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. Grand event in Chandrapur to mark the 12th anniversary of ‘Mann Ki Baat’
कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, सौ. सपनाताई मुनगंटीवार, जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, वासुदेव गाडेगोणे, गीताअनुवादक फातिमा बहन, पांडुरंग आंबटकर, किसनलाल चड्डा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गायत्री परिवाराचे सदस्य, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारा आणि विचारांना कृतीची जोड देणारा प्रेरणास्रोत आहे. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, शेती, सामाजिक परिवर्तन आणि सामान्य माणसाच्या असामान्य कार्याची देशाला ओळख झाली. सामान्य व्यक्तीने आपल्या कर्तृत्वातून समाजासमोर आदर्श निर्माण केला, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हीच ‘मन की बात’ची खरी ताकद आहे.या विचारांमधून प्रेरणा घेत जिल्ह्यात सैनिकी शाळा,वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन,अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण, स्मार्ट अभ्यासिका, वाचनालये, अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, जलसंधारण, कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक रोजगार प्रकल्प यांसह विविध विकासकामांना चालना देता आली. विकास म्हणजे केवळ इमारती उभारणे नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन आणि सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन समृद्ध करणे होय, असे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
‘मन की बात’च्या १३८ भागांतील विचारांचा समावेश असलेल्या QR कोडयुक्त पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी विचारांशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या भागांचे नियमित श्रवण करावे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत आणि आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. विचारांचे संकलन, त्यांचे आकलन आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यांमधूनच व्यक्तिमत्त्व घडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समाजात परस्पर आदर, समजूतदारपणा आणि मानवतेची भावना दृढ झाली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मुनगंटीवार यांनी केले. गीताअनुवादक फातिमा बहन यांनी भगवद्गीतेतील विचारांचा उर्दू भाषेच्या माध्यमातून प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. भगवद्गीतेतील कर्तव्य, कर्म आणि शांततेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. धर्म कोणताही असला, तरी मानवतेचे कल्याण आणि परस्परांप्रती आदर हीच समाजाला जोडणारी मूल्ये आहेत, असे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले. विविध धर्मांचे प्रतिनिधी, युवक, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांचा कार्यक्रमातील सहभाग सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले.
२५ हजार युवकांच्या सहभागातून भव्य युवा संमेलन; समृद्ध चंद्रपूरचा संकल्प
९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवीन चंद्रपूर परिसरात भव्य युवा संमेलन आयोजित करण्यात येणार असून, १२ जानेवारी रोजी सुमारे २५ हजार युवकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट असल्याची घोषणा आमदार मुनगंटीवार यांनी केली. साहित्य, उद्योग, शेती, शिक्षण, संशोधन आणि विविध क्षेत्रांत युवकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय स्तरावर उंचवावी, हा या संमेलनामागील व्यापक हेतू आहे. चंद्रपूर जिल्हा नशामुक्त, आरोग्यसंपन्न, ज्ञानसमृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युवकांची शक्ती सकारात्मक दिशेने वळविण्याचे आवाहन त्यांनी केले.मोबाईलचा वापर व्यसन म्हणून नव्हे, तर ज्ञान, कौशल्य आणि प्रगतीचे साधन म्हणून केला पाहिजे. युवकांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास करून कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असेही आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.
शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगाराच्या संधींना चालना
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. महिला शिक्षणासाठी विद्यापीठीय सुविधा, विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासासाठी केंद्रे, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार, कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी हाट यांसारख्या उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी, तसेच पौष्टिक अन्नाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कृषी हाट आणि फूड कोर्टची संकल्पना पुढे नेण्यात येत असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले. जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांच्या विस्तारासाठी करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या १३ राज्य पुरस्कारांपैकी ७ पुरस्कार पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना!
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बल्लारपूर विधानसभेतील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या १३ शेतकऱ्यांपैकी तब्बल ७ पुरस्कार पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले आहेत. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून, चंद्रपूरच्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्तृत्वातून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.
शेतकऱ्यांकडून आ.मुनगंटीवार यांचा सत्कार
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी या तीन तालुक्यांचा सुरुवातीला दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नव्हता. या तालुक्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळावा, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतर या तिन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल शेतकरी बांधवांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.