Review of Ganeshotsav preparations in Chandrapur district; strict enforcement of the ‘DJ’ ban
चंद्रपूर :- आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-2026 च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाने पूर्वतयारीचा आढावा घेत उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यात डीजे (DJ) वाजविण्यावर संपूर्ण बंदी राहणार असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. Review of Ganeshotsav preparations in Chandrapur district
पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार, डीजे चालक-मालक आदींसह सुमारे २०० ते २५० नागरिक उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवादरम्यान प्रत्येक मंडळाने समन्वय समिती स्थापन करून स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, मंडप परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था उभारावी आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील, अशा सूचनाही देण्यात आल्या.
यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन सांस्कृतिक परंपरा जपण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रशासनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत’ जिल्ह्यातील सर्व मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, श्री गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात डीजे वाजविण्यास पूर्ण बंदी राहणार असून ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. सर्व डीजे चालक-मालक, गणेश मंडळे आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा प्रशासन व चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यास सुरुवात केली असून, नागरिकांनी उत्सव शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्साहात साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
