चंद्रपूर :- बालकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येक प्रकरणाकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. विशेषतः पोक्सोसारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस, आरोग्य, महिला व बालविकास विभाग तसेच बाल संरक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून बालकांना होणारा त्रास कमी करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केले.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात पोलीस विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती व बाल न्याय मंडळ यांची समन्वय बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. नोपानी बोलत होते. पोक्सो प्रकरणांमध्ये विविध विभागांचा योग्य समन्वय हा बालकाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा असल्याचे श्री. नोपानी यांनी सांगितले. Coordination Meeting and Workshop on POCSO, Child Marriage, and Juvenile Justice
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना विविध यंत्रणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी परस्पर समन्वय, संवाद आणि योग्य कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगितले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
अॅड. अनिरुद्ध पाटील यांनी पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह प्रतिबंध, विविध प्रकरणांतील अनुभव आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय या विषयांवर प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. बालकांच्या क्षेत्रात काम करताना संवेदनशीलता किती महत्त्वाची आहे, तसेच ‘बालस्नेही दृष्टिकोन’ म्हणजे नेमके काय, हे त्यांनी स्पष्ट केले. बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये सर्व विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास त्याचा बालकाच्या हितावर तसेच न्यायप्रक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या शेवटी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे विषयतज्ज्ञ व मान्यवरांनी निरसन केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी प्रास्ताविकातून पोक्सो कायदा, बाल न्याय अधिनियम, बालविवाह तसेच बालकांसोबत काम करताना येणाऱ्या अडचणी आणि कायदेविषयक बाबींचे पुनरावलोकन व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी केले, तर अभिषेक मोहुर्ले यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील दोषसिद्धी कक्षाचे एपीआय विनोद रहांगडाले, महिला व बालविकास विभागाचे अतिश चव्हाण, अजय साखरकर यांच्यासह पोलीस विभाग, आरोग्य विभाग, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने सहकार्य केले.
#Chandrapur Police #POCSO #Child Marriage #Juvenile Justice
