चंद्रपुरात बसपाची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात
बूथ ते सेक्टर स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्याचा निर्धार; विविध नियुक्त्या व पक्षप्रवेश
चंद्रपूर :- बहुजन समाज पार्टीच्या चंद्रपूर जिल्हा संघटनेची समीक्षा व आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनीलजी डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पी.डब्ल्यू.डी. गेस्ट हाऊस येथे उत्साहात पार पडली. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून बूथ व सेक्टर स्तरापर्यंत संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. Organizational review meeting of BSP in excitement
बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी केले. संचालन जिल्हा महासचिव सुभाषजी पेटकर यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष बंबोडे साहेब यांनी केले.
यावेळी प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन प्रभारी प्रा. डॉ. मोहनजी राईकवार, प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी इंजि. महेंद्रजी मकेश्वर, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार तथा माजी IRS संजयजी थूल, BSP कायदेविषयक सल्लागार अॅड. पाटील, जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेशजी निकोसे, ओबीसी समाज नेते मंगेश ठाकरे यांच्यासह जिल्हा, विधानसभा व शहर स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत BLA-2 संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन, संघटनात्मक समीक्षा, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला.
बैठकीदरम्यान पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या. प्रा. देविदास बांबोळे यांची माना समाज जिल्हा संयोजक म्हणून, तर प्रा. राजेश ब्राम्हणे यांची लोकसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याचवेळी विकास शंकर कामडे, प्रवीण इस्तारी वडई आणि शिवाजी आढे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे तसेच नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
आगामी काळात पक्षाची विचारधारा व संघटनात्मक कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच बूथ व सेक्टर स्तरावरील संघटना सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून चंद्रपूर जिल्ह्यात बसपा ची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
