गडचिरोली :- अवैध दारू वाहतुकीविरोधात आष्टी पोलिसांनी कारवाई करत देशी-विदेशी दारूसाठ्यासह टाटा इंट्रा पिकअप वाहन जप्त केले. ९ ऑक्टोबरच्या रात्री मौजा अड्याळ शिवारात करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण १० लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना पाहताच वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. domestic and foreign liquor seized
येणापूर ते चामोर्शी मार्गावरून पिकअप वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अड्याळ शिवारात नाकाबंदी करून सापळा रचला. Ashti Police Station
दरम्यान, संशयित टाटा इंट्रा पिकअप वाहन क्रमांक MH 34 BZ 2982 येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रॉकेट देशी दारूच्या ९० मि.ली. क्षमतेच्या ३,९०० निपा, रुपये; रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ४८० निपा, हेवॉर्ड्स ५०० बिअरचे १२० कॅन, तसेच ऑल सीझन्स व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ४८ निपा असा ५ लाख ५९ हजार २०० रुपये किंमतीचा असून, पिकअप वाहनाची किंमत ५ लाख रुपये असा एकूण १० लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन आष्टी येथे संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. (अहेरी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, पोलीस अंमलदार प्रकाश सिडाम, वैभव एडाऊ आणि सुभाष वाकडे यांच्या पथकाने केली.
