चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठांतर्गत आचार्य (पीएच.डी.) पदवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा (PET) पुन्हा सुरू करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पेट परीक्षेचे परिपत्रक तातडीने निर्गमित करण्याबाबत कुलगुरूंनी आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले. Conduct the ‘PET’ exam for Ph.D. admissions
गोंडवाना विद्यापीठाने सप्टेंबर २०२३ पासून पेट परीक्षा घेणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासीबहुल भागातील गरीब, होतकरू आणि संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशाची संधी मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिले. यापूर्वीही पेट परीक्षा सुरू करण्यासाठी अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र त्यावर ठोस कार्यवाही झाली नसल्याने पुन्हा एकदा विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. Gondwana University Young Teachers’ Association
मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांसारख्या विद्यापीठांमध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठानेही पेट परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली.
विशेष म्हणजे, गोंडवाना विद्यापीठाच्या विद्या परिषद, अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये पेट परीक्षा घेण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. असे असतानाही अनेक महिने उलटून पेट परीक्षेसंदर्भातील परिपत्रक निर्गमित झाले नसल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली.
पेट परीक्षा सुरू न झाल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या संधी मर्यादित होत असल्याची भावना समाजात निर्माण होत असल्याचेही संघटनेने नमूद केले. विद्यापीठ प्रशासनाने याप्रकरणी तातडीने निर्णय घेऊन परीक्षेचे वेळापत्रक व आवश्यक परिपत्रक जाहीर करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. अन्यथा विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या हक्कासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ. विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई, ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. रामदास कामडी, डॉ. अक्षय धोटे, डॉ. राहुल सावलीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आचार्य पदवीसाठी पेट परीक्षा पुन्हा सुरू झाल्यास परिसरातील संशोधन इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आता या मागणीवर कोणती कार्यवाही करते आणि पेट परीक्षेचे परिपत्रक कधी जारी करते, याकडे विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
