चंद्रपूर :- शहरातील अवैध गोवंश कत्तल व गोमांस विक्रीविरोधात रामनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तुकूम तलाव परिसरातील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ नर गोवंशांची सुटका केली. या कारवाईत गोमांस तसेच गोमांस विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख ७३ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Ramnagar police raid on cattle slaughterers
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी शहरात अवैधरित्या गोवंशांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलिसांच्या शोध पथकाने माहिती संकलित करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तुकूम तलाव परिसरात राहणारे अब्दुल अनीस अब्दुल नबी कुरेशी (वय ४६) आणि नफान अब्दुल अनीस कुरेशी (वय २१) हे त्यांच्या राहत्या घरात कत्तलीसाठी गोवंश डांबून ठेवत असून गोमांसाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी घरातून गोमांस, वजनकाटा, गोमांस कापण्यासाठी वापरण्यात येणारा सत्तुर, लाकडी कुंडा तसेच ११ नर गोवंश आढळून आले. पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(क), ९, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(ड) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सुशांत व प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार बाबा नैताम, आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, प्रकाश मडावी, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, सुरज शेडमाके, ब्ल्युटी साखरे यांनी केली.