चंद्रपूर :- गोवंशीय जनावरांची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या सहाचाकी आयशर ट्रकवर पडोली पोलिसांनी कारवाई करत २८ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आयशर ट्रक, जनावरे आणि मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Padoli police strike a blow against cattle smuggling
नाकाबंदी पाहताच ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्न
पडोली चौकासमोर पोलिसांचे पथक नाकाबंदी करीत असताना, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लाल रंगाचा व निळ्या ताडपत्रीने झाकलेला आयशर ट्रक (क्र. MH-28-BB-4970) चंद्रपूरकडून इरई नदी मार्गाने येताना दिसला. पोलिसांनी ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने ट्रक पेट्रोल पंपाच्या आवारातून वळवून रिंग साईडने भरधाव वेगात पळ काढला. Chandrapur Today News
यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. संबंधित वाहन कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि पुढे राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा गावाकडे जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वरोडा गावातील रस्त्यावर अडथळा निर्माण करून ट्रक थांबविला. यावेळी चालकाने वाहन सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून गावाच्या शेतशिवारात त्याला ताब्यात घेतले.
ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये बैल व गायी मिळून एकूण २८ गोवंशीय जनावरे अमानुषपणे कोंबून भरलेली आढळली. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रकसह आरोपीला अटक करण्यात आली, यावेळी २८ गोवंशीय जिवंत जनावरे, टाटा कंपनीचा सहाचाकी आयशर ट्रक आणि व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पडोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. Crime News
या प्रकरणी अब्दुल हफिज गुफ्रान खान (वय ३३, रा. वार्ड क्रमांक ४, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर) या ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे, पोलीस हवालदार विनोद वानकर, पोलीस अंमलदार धिरजकुमार लोधी, समीर खाडे, श्रीनिवास वाभीटकर आणि धिरज भोयर यांनी केली.