Railway Development in Chandrapur-Ballarshah to Gain Momentum Thanks to the Initiative of MLA Sudhir Mungantiwar
मुंबई / चंद्रपूर :- चंद्रपूर व बल्लारशा रेल्वे स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी घेतलेल्या पुढाकाराला मोठे यश मिळाले असून, मुंबई येथे पार पडलेल्या मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांसोबतच्या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशेषतः चंद्रपूर रेल्वेलाईनलगतच्या अतिक्रमणधारकांवर कारवाई स्थगित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले, तर चंद्रपूर व बल्लारशा स्थानकांवरील सुविधा वाढ, तृतीय रेल्वे लाईन, टर्मिनल सुविधा व नवीन रेल्वे सेवांसंदर्भातही निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन रेल्वे महाप्रबंधक यांनी दिले. Railway Development in Chandrapur-Ballarshah
या बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी वर्धा-सेवाग्राम-बल्लारशा तृतीय रेल्वे लाईन व डंपिंग यार्ड प्रकल्पाबाबत ठोस पाठपुरावा करत जमीन अधिग्रहणासह प्रलंबित बाबींवर निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर रेल्वे स्थानकाला कोचिंग टर्मिनल सुविधा, नवीन प्लॅटफॉर्म उभारणी, स्टेशन विस्तार व प्रवेशद्वार सुधारणा यावरही सकारात्मक चर्चा झाली.यासोबतच बल्लारपूर येथून मुंबई व पुण्याकडे दररोज रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी मांडली. यावर महाप्रबंधकांनी प्रथम टप्प्यात साप्ताहिक गाड्या सुरू करून पुढे त्या दररोज करण्याचे आश्वासन दिले.
चंद्रपूर रेल्वेलाईनलगत वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत अत्यंत ठाम व आग्रही भूमिका मांडत तात्काळ कारवाई स्थगित करण्याची मागणी केली. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वेलाइनलगत असलेल्या २४ घरांसह इतर कुटुंबांचे म्हाडामार्फत पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. या मागणीची दखल घेत रेल्वे महाप्रबंधकांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ अतिक्रमकधारकांवर कारवाई न करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, रेल्वेसंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्नांचा सखोल आढावा घेण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांच्या सोबत विस्तृत बैठक आयोजित करण्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले. या बैठकीत चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे सुविधा, नवीन गाड्या, थांबे व पायाभूत सुविधा यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
तसेच चांदा फोर्ट व चंद्रपूर रेल्वे स्थानक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याबाबतही आ.मुनगंटीवार यांच्या सूचनेला महाप्रबंधकांनी सकारात्मकता दर्शवली असून, या सर्व निर्णयांमुळे चंद्रपूर–बल्लारपूर परिसरातील नागरिक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीस रेल्वे महाप्रबंधक प्रतीक गोस्वामी, भाजपा महामंत्री मंगेश गुलवाडे, सुनिता जयस्वाल, होमेश्वर नंदनवार, अमित निरंजने, महेश झिटे, वाणी सादलवार, विश्वजीत चंदेल, आकाश मस्के, हेमंत बोमीडवार, आशिष गिरडकर तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.