चंद्रपूर : शहरातील तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिक साहित्य व विविध मशिनरी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने LCB गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ससुर उर्फ कोलकाता साहजन मंडल (वय ३९, रा. फुटनगर, चंद्रपूर, मूळ रा. पश्चिम बंगाल) यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे २८ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Burglary, Accused nabbed by LCB
दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास छत्रपतीनगर, तुकूम येथील बांधकाम सुरू असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने इलेक्ट्रिक साहित्य, कटर मशीन, ग्राइंडर मशीन तसेच बांधकामासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य लंपास केले होते. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. १०६०/२०२६, कलम ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासा दरम्यान गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित ससुर उर्फ कोलकाता साहजन मंडल याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Chandrapur Crime
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपन्यांच्या ड्रिल मशीन, कटर मशीन, टायटन मशीन, रोटर मशीन, ग्राइंडर मशीन, तसेच दरवाज्याचे कब्जे व इतर बांधकामासाठी उपयुक्त साहित्याचा समावेश आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत २८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यास रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, लालू यादव, इमरान खान, हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, पोलीस अंमलदार शशांक बदामवार, किशोर वाकाटे तसेच सायबर सेल चंद्रपूरचे पोलीस हवालदार कार्तिक खनके आणि पोलीस अंमलदार गुणवंत व अनिमेश यांनी केली.
