चंद्रपूर :- ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचे आज, ९ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात आगमन होणार आहे. दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे यात्रेचे आगमन होऊन त्यानंतर महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रामनगर मार्गे दीक्षाभूमी, वरोरा नाका मार्गे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे दुपारी ३ वाजता यात्रेचा समारोप होणार आहे.
समारोप कार्यक्रमात प्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ओबीसी नेते आ. विजय वडेट्टीवार तसेच सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ५ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वागत व्यवस्था, प्रसिद्धी, निमंत्रण, सभास्थळाची तयारी, ध्वनी व्यवस्था, वाहतूक, शिस्त तसेच अन्य आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
‘मंडल दिवस सामाजिक न्यायाचा दिवस’
मंडल दिवस हा केवळ आरक्षणाचा दिवस नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि वंचित समाजाच्या सन्मानाचा दिवस आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. या कार्यक्रमाला नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल डहाके यांनी केले.
जातिनिहाय जनगणनेचा उल्लेख नसल्याने नाराजी
दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात जातिनिहाय जनगणनेचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जनगणनेच्या प्रत्येक टप्प्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून अधिकृत जातिनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.
ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित मंडल यात्रा व समारोप कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.
पत्रकार परिषदेला डॉ. अनिल डहाके, ॲड. विलास माथनकर, नंदू नागरकर, शिवा राव, राजस खोब्रागडे, अवधूत कोटेवार, शैलेश जुमडे, प्रवीण पडवेकर यांच्यासह सकल ओबीसी समाजाचे पदाधिकारी, ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.