चंद्रपूर :- वंचित, शोषित व पीडित ओबीसी समाजाला सामाजिक न्याय, घटनात्मक हक्क आणि आरक्षणाचे संरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे काढण्यात येत असलेल्या ‘मंडल यात्रा’ची सभा सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा येथील स्वयंवर मंगल कार्यालय, गडचांदूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.‘हर एक ओबीसी बनेगा काँग्रेस’ या संकल्पनेतून आयोजित या अभियानाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार, राजकीय प्रतिनिधित्व तसेच सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर जनजागृती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार या यात्रेतून व्यक्त करण्यात येत आहे. Congress to hold ‘Mandal Yatra’ rally in Rajura
मंडल यात्रेच्या पहिल्या दिवशी १० ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम व सभा झाल्यानंतर सायंकाळी राजुरा येथे मंडल यात्रा सभा होणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी भद्रावती, वरोरा, हिंगणघाट व वर्धा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ व जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनेनुसार सभेच्या आयोजनासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. यामध्ये राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष रंजन लांडे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष उत्तम पेचे, जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष डॉ. अंकुश गोतावले, गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष अशोक रेचनकर, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष सुरेश पावडे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल मालेकर, गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष महेंद्र कुनघाडकर तसेच जिवती तालुका काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग अध्यक्ष तिरुपती पोले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी आहेत.
“मंडल यात्रा ही केवळ राजकीय सभा नसून ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी जनजागृतीचे अभियान असल्याचे काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. राजुरा परिसरातील ओबीसी समाजबांधव, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.