Saturday, January 18, 2025
HomeChief Ministerमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana always in the service of women      Guardian Minister Sudhir Mungantiwar’s testimony

चंद्रपूर :- राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जिल्हास्तरीय लाभ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापालिका आयुक्त विपिन पालिवाल, सहायक जिल्हाधिकारी कश्मीरा संख्ये, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, पालिका प्रशासन सहआयुक्त विद्या गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, बल्लारपूरचे नगरपालिका मुख्याधिकारी विशाल वाघ, चंदनसिंग चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, रमेश राजुरकर आदी उपस्थित होते.

शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राची ही योजना कायम सुरू राहील, असे आश्वस्त करत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील महिला भगिनींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या योजनेसाठी नाव नोंदणी करावी. दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये याप्रमाणे बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. नाव नोंदणी न झालेल्या उर्वरित बहिणीच्या घरोघरी जाऊन प्रशासनामार्फत अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहे.

जिल्ह्यातील 2 लक्ष 84 हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळाला असून चंद्रपूर जिल्ह्यात 99 टक्के महिलांचे अर्ज पात्र करण्यात आले आहे. पैसे मिळाल्याचा मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आज प्रकर्षाने जाणवत आहे. हा आनंद नेहमीसाठीच असाच फुलत राहणार असून महिलांनी याबाबत कोणतीही काळजी करू नये. केंद्र व राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात. आणि त्यांच्या मागे असलेल्या बहिणींना आता राज्य शासनातर्फे वर्षाकाठी 18 हजार रुपये मिळणार आहे. 15 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून राज्यातील 1 कोटी 24 लक्ष बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचत आहे. रक्षाबंधनापर्यंत सर्वांना हे पैसे मिळणार असून ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. CM Majhi Ladki Bahin Yojana always in the service of women

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्यात 44 लक्ष नागरिकांना निराधारांचे अनुदान मिळत असून सुरुवातीला 600 रुपये देण्यात येत होते. आपण अर्थमंत्री झाल्यावर 600 रुपयांचे अनुदान वाढवून 1200 रुपये केले आणि आता राज्य सरकारतर्फे 1500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. ओबीसी आणि दुर्बल घटकातील मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाचे 100 टक्के पैसे सरकार भरणार आहे. एस.टी. बस प्रवासामध्येही महिलांना 50 टक्के तिकीट सवलत देण्यात आली आहे. जीवनदायी व आयुष्यमान योजनेतून महिलांची आरोग्य तपासणी होणार असून त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लाडक्या भावांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे.

आज जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले, यासाठी त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन. राज्य सरकार बहिणींच्या मागे खंबीरपणे उभे असून तळागाळापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्यात येतील. ज्या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्या तक्रारीकरिता कॉल सेंटर उभारण्यात येईल. या कॉल सेंटरवर आलेल्या तक्रारीची दखल तात्काळ प्रशासनाकडून घेण्यात येईल, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले

यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, राज्य सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन. लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात थेट जमा होत आहे. हा आत्मसन्मानाचा निधी असून भविष्यात यात वाढ केली जाईल. शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून या बहिणी नेहमीच पाठीशी उभे राहतील. तसेच मिळालेले पैसे हे बचतीला राखून ठेवावे, अशी अपेक्षा आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केली

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातून प्राप्त अर्जांपैकी एकूण 2 लक्ष 84 हजार अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार सूचना तसेच मार्गदर्शन केले.  या योजनेत आलेल्या अडचणी वरिष्ठ पातळीवरून सोडविल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा मोठा टास्क पूर्ण केला आहे, यात सर्वांची मेहनत आहे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

सेल्फी पॉईंटला Selfie Point उत्स्फूर्त प्रतिसाद

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या योजनांच्या स्टॉलची पाहणी केली. नागरिकांच्या जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योजनांची माहिती असलेले फलक आदी लावण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सेल्फी पॉईंट ला सुद्धा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला.

लाभार्थी मनोगत : या योजनेच्या लाभार्थी ठरलेल्या रोहिणी रामटेके म्हणाल्या, मी एक सामान्य कुटुंबातील तरुणी असून या योजनेचा अर्ज कुठे भरायचा, कसा भरायचा, याची इत्यंभूत माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली. ही योजना महिलांपर्यंत पोहोचल्याबद्दल प्रशासनाचे आभार. प्रणिता लांडगे म्हणाल्या, मी एक सामान्य घरातील गृहिणी आहे. घरात राहूनसुद्धा या योजनेचा लाभ म्हणून मला दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांनी ही अतिशय चांगली योजना महिलांसाठी सुरू केली असून ही योजना निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

धनादेश वितरण : प्रातिनिधीक स्वरूपात महिला लाभार्थ्यांना यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. मंगला पेंदाम, प्रियंका चांदेक, रसिका दुर्गे, शोभा वाकुडकर, वंदना वांढरे, संजीता रहमतुल्ला पठाण, मंगला खंडाळे आदींना प्रतिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच 1720 महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतल्याबद्दल कविता जाधव यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

स्टॉलची पाहणी : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यावेळी लाभार्थी महिलांनी मंचावरील सर्व मान्यवरांना राखी बांधून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार जिल्हा महिला बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular