Friday, January 17, 2025
HomeAssembly Electionमुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी आंतरराज्यीय समन्वय उत्तम ठेवा

मुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी आंतरराज्यीय समन्वय उत्तम ठेवा

Maintain good inter-state coordination for free and transparent elections – I.G. Dilip Patil Bhujbal

मुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी आंतरराज्यीय समन्वय उत्तम ठेवा – आय.जी. दिलीप पाटील भुजबळ*

*Ø चंद्रपुरात अधिका-यांची आंतरराज्यीय समन्वय बैठक*

चंद्रपूर :- आगामी काळात महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांची सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका मुक्त वातावरणात तसेच पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील अधिका-यांनी आंतरराज्यीय समन्वय उत्तम ठेवावा, अशा सुचना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिल्या.

वन अकादमी येथे आज (दि.9) चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली तसेच तेलंगणा राज्यातील आदिलाबाद आणि आसिफाबाद या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांची आंतरराज्यीय समन्वय बैठक पार पडली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, आसिफाबादचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक आर. प्रभाकर राव, आदिलाबादचे विशेष शाखेचे पोलिस अधिक्षक श्रीनिवास पोथारम, गडचिरोलीचे पोलिस उपअधिक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, चंद्रपूरचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.Inter – State Coordination Meeting of Officers at Chandrapur

सहा महिन्यांपूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, असे सांगून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, निवडणुकीच्या काळात अवैध रक्कमेची ने-आण, अवैध दारू वाहतूक तसेच अंमली पदार्थ तस्करी आदी बाबी रोखण्यासाठी आंतरराज्यीय अधिका-यांमध्ये उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मुक्त आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर 6 बॉर्डर चेक पोस्ट आहेत. या ठिकाणी तसेच इतरही सीमेवरील क्षेत्रात एस.एस.टी., व्ही.एस.टी. टीमचे तात्काळ गठण करावे. सोबतच महसूल विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वनविभाग आणि पोलिस विभागाने सुद्धा दक्ष असावे.

आंतरराज्यीय वरिष्ठ अधिका-यांसोबत वैयक्तिक भेट घ्या : आंतरराज्यीय वरिष्ठ अधिका-यांनी एकमेकांचे नाव, संपर्क क्रमांक तसेच सीमेवर असलेल्या चेक पोस्टवरील अधिका-यांची नावे आणि मोबाईल क्रमांक एकमेकांस शेअर करावेत. सीमेवरील चेक पोस्ट वर अधिका-यांची योग्य ड्यूटी लावावी. आंतरराज्यीय अधिका-यांनी उत्तम समन्वय आणि संपर्क ठेवावा. आसिफाबाद आणि आदिलाबादच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी वैयक्तिक भेट घ्यावी.

गुन्हेगारांवर कडक कारवाई करा : निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी गुन्हेगारांची यादी करून त्यांच्यावर तसेच गो – तस्करी, धार्मिक भावना भडकविणारे असामाजिक तत्व आदी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी. निवडणुकीच्या काळात अवैधरित्या रक्कम, दारू आदींची देवाण-घेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अवैध वाहतुकीचे मार्ग, पुरवठादार व साठवणूदार यांच्यावर कारवाई करावी. बॉर्डर चेक पोस्टवर सीसीटीव्ही, वायरलेस इत्यादी साहित्य पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिल्या.

जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाची सीमा तेलंगणातील आदिलाबाद आणि आसिफाबाद या जिल्ह्यांना लागून आहे. तेलंगणाच्या सीमेवर 6 चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. तर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, दोन्ही जिल्ह्यात उत्तम समन्वय असून एकमेकांना माहितीचे आदान-प्रदान करण्यात येते. यावेळी यवतमाळ, गडचिरेाली, आसिफाबाद आणि आदिलाबाद येथील अधिका-यांनीसुध्दा सादरीकरण केले.

बैठकीला चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, वन अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular