चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोरास ताब्यात घेतले. प्रतिक धनराज झाडे (वय ३३, रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, त्याच्या चौकशीतून एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यात आढळून आलेली TVS मोटारसायकल क्रमांक MH-34-BU-5217 ही पडोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्र. २९१/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दुध डेअरी कॉलनी, चंद्रपूर येथील झाडी-जंगलासह इतर ठिकाणांहून आणखी तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांमध्ये TVS मोटारसायकल (MH-34-BU-5217) किंमत 40 हजार रुपये, होंडा अॅक्टिव्हा (MH-34-CA-4413) किंमत 50 हजार रुपये, होंडा अॅक्टिव्हा (MH-31-FL-7928) किंमत 80 हजार रुपये आणि हिरो स्प्लेंडर प्लस (MH-34-AG-6839) किंमत 60 हजार रुपये यांचा समावेश आहे.
याशिवाय बल्लारशाह पोलीस ठाण्यातील अपराध क्र. ८४३/२०२६ मधील चोरीची पॅशन प्रो मोटारसायकल आरोपीने माणिकगड, राजुरा परिसरात बेवारस अवस्थेत सोडल्याचे तपासात समोर आले. सदर मोटारसायकल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली आहे.
या कारवाईत चार दुचाकींचा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीच्या चौकशीतून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी पोलीस ठाणे पडोली, जि. चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात उपविभाग चंद्रपूर पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने केली.
