चंद्रपूर :- बैल पोळ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पारंपरिक ‘तान्हा बैल पोळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांनी आकर्षक पद्धतीने लाकडी बैल सजवून या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला. नागरिकांसह महिला व बालकांची मोठी उपस्थिती असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘Tanha Bail Pola’ celebrated in Chandrapur
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत अबीर अजय साखरकर याने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळविला. आयोजकांच्या हस्ते अबीरला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, पारंपरिक सणांचे महत्त्व अधोरेखित करत अबीरने उपस्थित बालकांना मोबाईल फोन आणि व्हिडिओ गेमच्या आहारी न जाता आपल्या संस्कृतीशी व परंपरांशी जोडलेले राहण्याचे आवाहन केले. “तुमच्या संस्कृतीशी जोडले जा, तुमच्या मोबाईल फोनशी नाही,” असा संदेश त्याने यावेळी दिला.
पारंपरिक खेळ, सण आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिमुकल्यांनी सजविलेल्या लाकडी बैलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
