Friday, September 11, 2026
HomeJudicialचंद्रपूर जिल्ह्यात उद्या १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

चंद्रपूर जिल्ह्यात उद्या १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी ही लोक अदालत घेण्यात येणार आहे. National Lok Adalat to be held in Chandrapur

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आपसी समझोता व सर्वसंमतीने त्वरित निकाली काढणे हे लोक अदालतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लोक अदालतीत झालेल्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याइतकेच महत्त्व असून, त्याची कायदेशीर अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रम वाचून वादांचा कायमस्वरूपी आणि सामंजस्याने निपटारा होण्यास मदत होते.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम १३८ एन.आय. अॅक्टअंतर्गत धनादेश न वटण्याची प्रकरणे, बँक कर्जवसुली, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, जमीन अधिग्रहण, कामगार कायद्यांतील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विवाह विच्छेद वगळता), इलेक्ट्रीसिटी अॅक्टअंतर्गत समझोतायोग्य वाद आदी प्रकरणांचा समावेश आहे.

तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रि-लिटीगेशन प्रकरणे, महसूल, पाणीपट्टी, वीजबिल आदी बाबींमध्येही आपसी समझोत्याद्वारे वाद मिटविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोक अदालतीच्या कार्यवाहीसाठी पक्षकारांना स्वतंत्र शुल्क आकारले जात नाही.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर श्री. अभय क. लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येत आहे. नागरिक, पक्षकार तसेच संबंधितांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या नागरिकांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची आहेत, त्यांनी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०७१७२-२७१६७९ अथवा कार्यालयीन मोबाईल क्रमांक ८५९१९०३९३४ वर संपर्क साधता येईल.
ही माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरचे सचिव श्री. सुधीर शि. इंगळे यांनी दिली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular