Inter-state counterfeit note gang busted
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात बनावट चलन तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. उर्जानगर परिसरातील राजश्री अपार्टमेंट येथील एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात ५०० रुपयांच्या रंगीत छायांकित बनावट नोटा व प्रिंटरसह साहित्य असा एकूण ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Inter-state counterfeit note gang busted
मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उर्जानगर मेजर गेटजवळील राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ मध्ये काही इसम ५०० रुपयांच्या बनावट रंगीत छायांकित नोटा तयार करत आहेत.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला. मात्र फ्लॅटला कुलूप असल्याने फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉल (रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) यांना बोलावण्यात आले. त्यांनी हा फ्लॅट मागील महिनाभरापासून मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना भाड्याने दिल्याची माहिती दिली.
त्यानंतर पंचांसमक्ष फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता बेडरूममध्ये १० खोके भरून ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या रंगीत छायांकित बनावट नोटा, तसेच EPSON कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हा ९१,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी पुढील तपासात आरोपींचा शोध घेऊन शुभम दिनेश नागर (वय २६, रा. पंचेड, ता. रतलाम, जि. रतलाम, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. आरोपीने फसवणुकीच्या उद्देशाने बनावट नोटा तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(३), ३३६(२), ३३६(३) व १८२(१) अन्वये अपराध क्रमांक १९६/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदे पाटील, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकरेडवार, बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार यांच्यासह पोलीस कर्मचारी जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपूलवार, गणेश मोहुर्ले, नितीन रायपूरे, रजनीकांत पुट्टावार, किशोर वकाटे, अजित शेंडे, चालक दिनेश अराडे, प्रमोद डंभारे तसेच महिला पोलीस कर्मचारी निराशा तितरे, विजयमाला वाघमारे, छाया निकोडे, अपर्णा मानकर, दिपिका सोडनार व उषा लेडांगे यांनी सहभाग घेतला.