Literary people’s appeal to save the environment
चंद्रपूर :- चंद्रपूर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर तर जगातील तापमानवाढीतील सर्वात उष्ण परिसर. आधीच जगणे कठीण असतांना ताडोबा व्याघ्र कॅरिडोअरमधील घनदाट जंगलातील लोहारडोंगरी येथे लोहखाणीला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली. मानव – वन्यजीव संघर्षात मागील ५ वर्षात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०० हून अधिक बळी गेले आहे. ताडोबा, लोहारडोंगरी, चंद्रपूर वाचवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाच्या समर्थनार्थ पर्यावरण व चंद्रपूर वाचवण्यासाठी चंद्रपूरातील साहित्यिकांनी एकत्र येत आंदोलनस्थळी अनोखे शोक कवी संमेलन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रशासनाचे लक्ष वेधत कवितातून शोक व्यक्त केला. Become an MLA, become a minister but sir, be a little environmentalist
साहेब उन्हाळ्यात सूर्याची
तुम्हालाही बसते ना झळ
समजून घ्याना मग
झाडांचीही असते आतली कळ
विधानसभेत दाखवाना
मानव – वन्यजीव प्रश्नांसाठी बाणा
आमदार बना तुम्ही मंत्रीही बना
पण साहेब थोडं तरी पर्यावरणवादी बना
युवा कवी स्वप्नील मेश्राम यांनी कवितेतून लोकप्रतिधींवर ताशेरे ओढत पर्यावरणवादी बनण्याचे आवाहन केले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे, कवी किशोर मुगल, केशव कुकडे, विजय वाटेकर, सोनाली धनमने यांनी पर्यावरणामुळेच माणूस मोकळा श्वास घेवू शकतो. आपला श्वास वाचवण्यासाठी लढण्याची गरज असल्याची भावना कवितेतून व्यक्त केली.
जेव्हा शेती जाते कंपनीत
तेव्हा केवळ माती जात नाही
परंपरेची भूक करपली जाते
प्राणी जातो, पक्षी जातो
आणि शेवटी माणूसही जातो…
प्रसिद्ध कवी किशोर कवठे यांनी कंपनीत शेती जाते तेव्हा मानवी उद्ध्वस्तीकरणाला सुरुवात होते आणि माणूसही शेवटी संपतो अशी खंत व्यक्त करत वेळीच जागृत होण्याचे आवाहन केले. किशोर जामदार, प्रविण आडेकर, जयंत साळवे, सुरज दहागावकर, सीमा भसारकर, शंकर लोढे यांनीही खाणींमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो असे शब्दात मांडून ताडोबा आणि लोहार डोंगरी वाचवणे गरजेचे असल्याचे मत मांडले. Poets’ conference mourns environmentalist Bandu Dhotre’s protest
हसदेव, सुरजागड, सारंडा, नियमगीरी,
बैलाडीला, बक्सवाहा, मुंडारी खुटकट्टी
पुन्हा किती हिरव्या समृद्धीचे बळी घेणार आहोत ?
कळत असूनही वळत नाहीय
आपण आपलाच बळी देणार आहोत…
कार्यकर्ते कवी अविनाश पोईनकर यांनी देशभरातील जंगले नष्ट करत खाणीत आपण आपली जैवविविधता आणि पर्यायाने आपलाच बळी देत असल्याची कैफीयत कवितेतून मांडली. जयश्री कापसे, नटराज गेडाम, जगदीश नंदूरकर, देवराव माऊलीकर यांनीही जल, जंगल, जमीन जतनाचा संदेश दिला.
इथे सांडल्या भावना बीज अंकुरेल पुन्हा
आणि नव्या घरट्याचा पक्षी करतील गुन्हा
कवयित्री गीता देव्हारे – रायपुरे यांनी बंडू धोत्रे यांच्या पर्यावरणासाठी लढ्याला बळ देत आपण ही लढाई जिंकू असा आशावाद व्यक्त केला. कवी रेवानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शोक कवी संमेलनात सुरेश गारघाटे, विघ्नेश देशमुख, महादेव ढुमने, शुभम वडस्कर, शालिक दानव आदी कवींनी पर्यावरणावर कविता सादर करत बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला व प्रशासनाच्या बेकायदेशीर धोरणांवर ताशेरे ओढत शोक व्यक्त केला.
कविसंमेलनाचे संचालन आणि नियोजन अविनाश पोईनकर, किशोर जामदार, सुरज दहागावकर यांनी केले. चंद्रपूरात पहिल्यांदाच साहित्यिक एकत्र येत लढ्यात सहभागी झाले, हे विशेष.