MLA Kishore Jorgewar lays the foundation stone for the Baniwala Gymnasium work
चंद्रपूर :- आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. अशा वेळी योग्य व्यायाम, योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरण मिळाले, तर तरुण कुठल्याही क्षेत्रात आपली छाप पाडू शकतात. आज आपण व्यायामशाळेच्या भूमिपूजनासाठी एकत्र आलो आहोत, ती केवळ एक इमारत नाही, तर ती चंद्रपूरच्या तरुणाईला घडवणारी एक शिस्तबद्ध कार्यशाळा ठरणार आहे. शरीरसंपन्न, सशक्त आणि स्वाभिमानी युवक घडविण्यासाठी ही व्यायामशाळा एक मजबूत मंच ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. MLA Kishore Jorgewar lays the foundation stone for the Baniwala Gymnasium work
आमदार किशोर जोरगेवार यांनी दादमहल वॉर्डातील बानिवाला व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, अजय वैरागडे, राशिद हुसेन, बशीर पठाण, श्याम धोपटे, किरणे ठाकरे, शेखर शेट्टी, नाहिद हुसेन, करणसिंह बैस आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आपण दरवर्षी माता महाकाली राज्यस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करत आहोत. ही स्पर्धा केवळ चंद्रपूरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. ही परंपरा पुढे चालवण्यासाठी आणि चंद्रपूरमधून नवे बॉडी बिल्डर घडवण्यासाठी सुसज्ज नवी व्यायामशाळा उभारणे आवश्यक आहे.
विकास फक्त रस्त्यांचा किंवा इमारतींचा नसतो. आपले युवक योग्य पद्धतीने घडले, त्यांना योग्य दिशा मिळाली, तर संपूर्ण समाज उभा राहतो. त्यामुळे या व्यायामशाळेचे काम हे केवळ शासकीय नसून एक सामाजिक संकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. The gym to be built will be a disciplined workshop that will create physically fit, strong youth
आपण मागील काही वर्षांत चंद्रपूर मतदारसंघाचा सर्वसमावेशक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजभवने, अभ्यासिकांचे जाळे, व्यायामशाळा याकडे आपण विशेष लक्ष दिले आहे. यातून युवा पिढी घडणार असून समाजहिताचे कार्य हेच आमचे प्राधान्य असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
तयार होत असलेली बानिवाला व्यायामशाळा ही फक्त एक इमारत किंवा सरकारी योजना नाही. ती आपल्या परिसरातील तरुणाईच्या आत्मविश्वासाची आणि आरोग्याच्या जिद्दीची जागा ठरणार आहे. आज जी मुहूर्तमेढ रोवली जात आहे, ती उद्या आपल्या परिसरातील अनेक तरुणांना शरीरसंपन्न, कर्तबगार आणि देशसेवेसाठी सिद्ध होणाऱ्या शारीरिक व मानसिक बळाची प्रेरणा देणारी ठरेल, असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
