Saturday, January 18, 2025
HomeHealthजिल्हा सामान्य रुग्णालयात आता रुग्णांना भेटण्याकरिता पास बंधनकारक

जिल्हा सामान्य रुग्णालयात आता रुग्णांना भेटण्याकरिता पास बंधनकारक

Chandrapur District General Hospital (GMC) now requires pass to see patients

चंद्रपूर :-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे.

रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाईकाकडे एक हिरव्या रंगाचा व एक लाल रंगाचा पास देण्यात येईल. हिरव्या रंगाचा पास हा रुग्णाजवळ नेहमी थांबणाऱ्या नातेवाईकांकरिता असेल, तर लाल रंगाचा पास हा रुग्णालय प्रशासनामार्फत भेटीसाठी नेमून दिलेल्या दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत इतर नातेवाईकांना भेटण्याकरिता राहील. लाल रंगाच्या पास वर एकावेळी एका नातेवाईकाला रुग्णास भेटण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच आधी गेलेला नातेवाईक परत आल्यानंतर त्याच पासचा वापर करून दुसऱ्या नातेवाईकास आत प्रवेश देण्यात येईल. सदर पासची वैधता 7 दिवसांकरिता राहील.

रुग्ण जर 7 दिवसांपेक्षा जास्त कालावधीकरिता भरती राहिल्यास सदर पासवर आंतररुग्ण नोंदणी विभागातून नवीन तारखेचा शिक्का मारून घेणे आवश्यक आहे. तसेच पास हरवल्यास 50 रुपये प्रतीपास दंड आकारण्यात येईल. दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर रुग्णाकडील दोन्ही पास वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे जमा करण्यात यावे. त्याशिवाय रुग्णास सुट्टी देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

तर होणार 500 रुपये दंड : रुग्णालयाचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ राहावा, याकरिता धूम्रपान करणे, पान, गुटखा, खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे टाळावे. परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना किंवा थुंकताना आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

बाहेरील वाहनांना प्रवेश निर्बंध : रुग्णालय परिसरामध्ये विनाकारण बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फक्त रुग्णांची ने – आण करण्याकरिता मर्यादित वेळेसाठीच बाहेरील वाहनांना प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वाहन पासेस उपलब्ध करुन दिल्या जाईल सदर पासच्या आधारे त्यांना रुग्णालयात वाहनासह प्रवेश देण्यात येईल.

विनापरवानगी फोटो /व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई : रुग्णालयाच्या आत तसेच परिसरात विनापरवानगी फोटो तसेच व्हिडिओग्राफी काढण्यास मनाई असून असे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायची असल्यास वैद्यकीय अधीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊनच काढण्यात यावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन : जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तैनात झालेले सुरक्षा रक्षक, रुग्णालय प्रशासन, तसेच येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular