चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘इतर मागासवर्गांच्या कल्याणासंबंधीच्या संसदीय समितीवर’ २०२६-२७ या वर्षाच्या कार्यकाळासाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. MP Pratibha Dhanorkar appointed to the Parliamentary ‘Committee on Welfare of Other Backward Classes
लोकसभा सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिनांक ९ सप्टेंबर २०२६ ही निवड जाहीर करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२६ च्या संसदीय बातमीपत्र भाग-२ (क्र. ६११९) नुसार या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, लोकसभा अध्यक्ष यांच्या मान्यतेने खासदार प्रतिभा धानोरकर यांची या समितीवर नियुक्ती झाली आहे. या समितीच्या सभापतीपदी खासदार गणेश सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागासवर्गीय, बहुजन व ओबीसी समाजाच्या विविध समस्या, त्यांचे हक्क, शैक्षणिक व सामाजिक विकास, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर ही संसदीय समिती लक्ष ठेवते. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या समितीवरील नियुक्तीमुळे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे प्रश्न संसदेत अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार आहे.
आपल्या या निवडीबद्दल बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा अध्यक्षांचे व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून, “ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, आरक्षणाच्या मुद्द्यांवर आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संसदेत सातत्याने आवाज उठवत राहणार” असा विश्वास व्यक्त केला आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांची या महत्त्वाच्या समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रपूर, आर्णी – वणी लोकसभा क्षेत्रातील नागरिक, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
