चंद्रपूर : “आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही नागरिकाचे उपचार थांबता कामा नयेत. शासनाच्या आरोग्य योजना आणि वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन MLA Kishore Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Chief Minister Free Mega Health Camp
चिमुकल्या रुद्रला मिळाले नवजीवन……
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर तसेच भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे दोन हजार नागरिकांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, महामंत्री रविंद्र गुरनुले, मनोज पाल, सविता दंढारे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, बलराम डोडाणी, तुषार सोम, प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर, मनपा गटनेते शेखर शेट्टी, नगरसेविका पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, जयंत टोंगे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज अनेक गंभीर आजार केवळ वेळेवर निदान न झाल्यामुळे जीवघेणे ठरतात. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार सुरू करता येतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता अधिक आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आणि त्यांना उपचारासाठी आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून अनेक महागडे उपचार पूर्णपणे मोफत होऊ शकतात. मात्र, माहितीअभावी अनेक रुग्ण या लाभापासून वंचित राहतात. अशा शिबिरांमधून केवळ तपासणीच होत नाही, तर पात्र रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशासकीय मदतही दिली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. निरोगी समाजाशिवाय विकसित समाजाची कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रात लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबवून प्रत्येक कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. भविष्यातही अशा महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिरात जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, हृदयरोग, कर्करोग, न्यूरोलॉजी, नेत्ररोग, दंतरोग, अस्थिरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, मूत्रपिंड विकार, फिजिओथेरपी आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारासाठी पात्र रुग्णांची नोंदणी करून त्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
