चंद्रपूर :- विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीने भोजनदानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो धम्म अनुयायांना भोजनदान करून कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा संदेश दिला. Food donation by Agriculture Department at Chandrapur Deekshabhoomi
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी झाली होती. या अनुयायांची सेवा करण्याच्या भावनेतून कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने भोजनदानाचे आयोजन केले. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या कृषी परिवाराने या उपक्रमातून समाजसेवेची आपली बांधिलकी अधोरेखित केली. Dhammachakra Anupravartan Day
या भोजनदान कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म अनुयायांना भोजन वाढण्यात आले. सेवाभाव आणि समतेच्या विचारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे उपस्थित अनुयायांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, प्रज्ञा मून, राजू ढोले, विनोद कोसनकर, सुषमा कांबळे, दशरथ तावाडे, भारती घागरगुंडे, रोशन गायकवाड, चेतन सहारे, अनिल देबटवार यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार कृतीत उतरविण्याच्या दृष्टीने अन्नदानाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. अन्नदानासारख्या सेवाकार्यातून शासकीय यंत्रणेतील सामाजिक जाणीव आणि माणुसकीचे दर्शन घडते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कृषी विभागाच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
