Little Rudra gets a new lease on life; visits MLA Kishore Jorgewar a year later
चंद्रपूर :- वणी येथील अवघ्या सहा महिन्यांच्या रुद्र धोंगेच्या हृदयात जन्मजात छिद्र असल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी आई-वडिलांची सुरू असलेली धडपड पाहून आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत रुद्रच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेची व्यवस्था केली होती. तब्बल एका वर्षानंतर पूर्णपणे निरोगी झालेला रुद्र आपल्या आईसोबत आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेटीस आला. यावेळी रुद्रला आनंदाने धावताना, खेळताना आणि खळखळून हसताना पाहून तेथील वातावरण भारावले….
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४६ बालकांच्या निःशुल्क हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रुद्र धोंगेचाही समावेश होता. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुद्रला नवजीवन मिळाले असून आज तो सर्वसामान्य मुलांप्रमाणे निरोगी आयुष्य जगत आहे.
रुद्रची भेट झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते, पूल, इमारती उभारता येतात; मात्र एखाद्या चिमुकल्याला नवजीवन देण्याची संधी मिळणे आणि एका आईच्या डोळ्यांतील अश्रू आनंदात बदलताना पाहणे, याहून मोठा सन्मान दुसरा असू शकत नाही. रुद्रच्या चेहऱ्यावरचे हे निरागस हास्य कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मौल्यवान आहे.”
यावेळी त्यांनी परमेश्वराकडे रुद्रच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच भविष्यातही अशाच गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची संधी मिळावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
रुद्रच्या पुनर्भेटीने सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशील लोकप्रतिनिधित्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण पुन्हा एकदा समोर आले असून, या क्षणाने उपस्थितांच्या मनात कायमची भावनिक आठवण निर्माण केली.
