चंद्रपूर : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची आणि राजकीयदृष्ट्या वादळी ठरलेली घडामोड पार पडली असून, विद्यमान सभापती डॉ. विजय देवतळे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव १२ विरुद्ध ५ मतांच्या प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खंबीर आणि आक्रमक नेतृत्वापुढे विरोधक निष्प्रभ ठरले असून आमदारांना जोरदार धोंबीपछाड देत खासदार धानोरकर यांच्या नेतृत्वाचा डंका पुन्हा एकदा वाजला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे बाजार समितीवरील डॉ. देवतळे यांची सत्ता संपुष्टात आली असून, तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाने आपले वर्चस्व पूर्णपणे सिद्ध केले आहे. Change of power in APMC Warora Market Committee under the leadership of MP Pratibha Dhanorkar
गेल्या काही काळापासून बाजार समितीच्या कारभारावर आणि धोरणांवर बहुसंख्य संचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. सभापतींच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या उद्देशाने संचालकांनी अविश्वास प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार पार पडलेल्या विशेष बैठकीत एकूण १७ संचालकांपैकी १२ संचालकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करत विरोधकांना जोरदार दणका दिला, तर केवळ ५ संचालकांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करता आले. बहुमताचा हा स्पष्ट कौल डॉ. देवतळे यांच्या कारभाराविरोधातील संचालकांचा तीव्र रोष आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावरील ठाम विश्वास दर्शवणारा ठरला आहे.
या सत्तांतरावर आणि दणदणीत विजयावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र असते. तिथे पारदर्शकता आणि शेतकरीहित सर्वोच्च राहिले पाहिजे. मागील काही काळापासून संचालकांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वास गमावलेल्या नेतृत्वाला हटवून बाजार समितीत लोकशाही मार्गाने नवीन पर्व सुरू करण्यात आले आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो असून, आगामी काळात बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितालाच प्रथम प्राधान्य दिले जाईल.”
सर्व निष्ठावंत संचालकांनी एकत्र येत दाखवलेल्या एकजुटीमुळेच हे ऐतिहासिक सत्तांतर शक्य झाले आहे. सर्व संचालकांना सोबत घेऊन बाजार समितीचा ढासळलेला कारभार पुन्हा रुळावर आणणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना योग्य भाव, आधुनिक सुविधा आणि पारदर्शक व्यवहार मिळावेत यासाठी नवीन सभापतींच्या निवडीनंतर तातडीने कामाला सुरुवात केली जाईल. वरोरा बाजार समितीतील या सत्तांतरामुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
