Permission granted for DJs at restricted volume during Ganeshotsav
चंद्रपूर :- गणेशोत्सवात डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी गणेश मंडळे, गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मध्यस्थी करत या प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींसह मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. Permission granted for DJs at restricted volume during Ganeshotsav
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, तुषार सोम, गणेश मंडळातील दर्शन बुरडकर, ईश्वर वाघमारे, हर्षल कानमपल्लीवार, रोहित लडके, गणेश गोहकर, शेखर हजारे, केतन लुटे तसेच डीजे असोसिएशनचे उमेश लांडगे, देवाशीष गांगुली, निशांत निखार, प्रज्वल चोपावर आदी उपस्थित होते.
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिले होते. या निर्णयामुळे गणेश मंडळे, गणेशभक्त तसेच डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज, बुधवारी गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत धार्मिक भावना, उत्सवाचे पारंपरिक स्वरूप तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.
चर्चेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लागला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने मोठे साऊंड सिस्टिम न लावता तसेच अत्यंत मोठ्या आवाजात डीजे न वाजविता मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात येईल.
मात्र, यासाठी संबंधित गणेश मंडळ किंवा डीजे मालकांनी पोलीस प्रशासनाकडे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील. या स्वयंघोषणापत्राद्वारे शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात येईल, तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण असून तो शांततेत व नियमांचे पालन करून साजरा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. गणेशभक्तांच्या धार्मिक भावना जपत नागरिकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असा समतोल राखत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे गणेश मंडळे आणि डीजे असोसिएशनमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.