Prime Minister Narendra Modi Commends Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई / चंद्रपूर : – ‘विकसित भारत 2047’ च्या ध्येयपूर्तीसाठी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची जोड महत्वपूर्ण ठरणार आहे. ‘विकसित भारत’चे स्वप्न साकारताना महाराष्ट्र महत्वपूर्ण सहभाग देत असल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. PM Modi Lauds ‘Developed Maharashtra’; Praises Fadnavis’s Leadership
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadanvis यांना पत्र पाठवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देण्याची ग्वाही दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र हा देशाच्या नागरी संस्कृतीचा प्रेरणास्रोत राहिला आहे. शौर्य, समाजसुधारणा आणि राष्ट्र उभारणीची परंपरा येथे खोलवर रुजलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांपर्यंत महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्राला लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि संत परंपरेचे योगदान असल्याचे सांगून त्यांनी राज्याच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव केला आहे.
यंदाचे वर्ष महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे नमूद करत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती, महात्मा फुले यांची 200 वी जयंती, संत गाडगेबाबा यांची 150 वी जयंती, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीचे वर्ष आहे. राज्य सरकारने हे वर्ष ‘समता आणि सामाजिक समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वाच्या बाबींचा विशेष उल्लेख केला. मराठा साम्राज्याशी संबंधित महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान आणि पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण या घटनांनी महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर सन्मान वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या योगदानाचे कौतुक करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील औद्योगिक क्षेत्र उद्योग आणि नवोन्मेषाचे भविष्यवेधी केंद्र म्हणून उदयास येत आहे. सन 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 24 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचा उल्लेख करत मुंबई मेट्रो ‘ॲक्वा लाईन’ विस्तार, नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर आणि शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डेटा सेंटर, डिजिटल पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रात महाराष्ट्र आपले नेतृत्व कायम ठेवत आहे. मुंबई हे चित्रपट आणि सर्जनशील उद्योगाचे केंद्रस्थान असून ही ऑरेंज इकॉनॉमी मजबूत करण्यात महाराष्ट्र एका आधारस्तंभाची भूमिका बजावत राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात होत असलेल्या गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करीत तेथील बदल ‘नव्या विकास पर्वाची सुरुवात’ असल्याचे प्रधानमंत्री यांनी नमूद केले आहे. तसेच मराठवाड्यातील पाणी प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शुभेच्छा देतानाच केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत सोयी सुविधा पुरविण्याचे काम केले जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
प्रधानमंत्र्यांनी कामगार, शेतकरी, उद्योजक, संत आणि सामान्य नागरिक यांच्या योगदानाचा गौरव करत ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका निर्णायक राहील,’ असा विश्वास व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील काही दुःखद घटनांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे कार्य कायम लोकांना प्रेरणा देत राहतील, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला सर्वतोपरी पाठबळ देण्याची आपली वचनबद्धता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्राद्वारे अधोरेखित केली आहे.