Tuesday, June 16, 2026
HomeElectionबीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा

बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा

बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करा; भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांवर बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्या मोबाईल अॅपमध्ये डेटा मॅपिंग होत नसल्याने मतदार यादी अद्ययावतीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दा भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली.

भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रांवर बीएलओ अॅपमध्ये डेटा मॅपिंगची समस्या अनेक दिवसांपासून कायम असून त्यामुळे मतदार याद्यांची पडताळणी व अद्ययावतीकरणाचे काम प्रभावित होत आहे. विशेषतः मोरेवा येथील बूथ क्रमांक ७ व ८, लालपेठ येथील बूथ क्रमांक २२९ व २३०, हनुमान नगर येथील बूथ क्रमांक ३१६ व ३२० तसेच नकोडा येथील बूथ क्रमांक ३७७ येथे ही समस्या गंभीर स्वरूपात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आलेल्या नसल्याची खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डेटा मॅपिंगचे काम वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने निर्देश देऊन बीएलओ अॅपमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, जेणेकरून मतदार यादी अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, बलराम डोडाणी, सुमित बेले, विश्वजित शाहा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular