Sunday, August 30, 2026
HomeEducationalमनपाच्या अभ्यासिकांची ‘अस्वच्छ’ अवस्था

मनपाच्या अभ्यासिकांची ‘अस्वच्छ’ अवस्था

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिका व वाचनालयांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अभ्यासिकांमध्ये अस्वच्छता, दुर्गंधी तसेच सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी केला आहे. ‘Unsanitary’ Condition of Chandrapur Municipal Study Centers

येत्या १५ दिवसांत अभ्यासिकांमधील सुविधा सुरळीत न केल्यास महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. NSUI

माजी महापौर संगीता अमृतकर यांनी यापूर्वीच अभ्यासिकेतील समस्यांकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२८ ऑगस्ट रोजी केलेल्या पाहणीत धक्कादायक स्थिती

२८ ऑगस्ट रोजी पाहणी केली असता, गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून स्वच्छतागृहातील सांडपाणी थेट अभ्यासिकेत झिरपत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही मोठा तुटवडा असल्याचे बोंडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने शहरात कस्तुरबा रोड येथील महात्मा गांधी वाचनालय, सिव्हिल लाइन्स येथील हुतात्मा स्मारक वाचनालय, बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका, भानापेठ वॉर्डातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका आणि गंजवॉर्ड येथील श्री कोलबा स्वामी महाराज अभ्यासकेंद्र अशी पाच अभ्यासकेंद्रे चालविली जातात. यापैकी भानापेठ व गंजवॉर्ड येथील अभ्यासिकांची अवस्था विशेषतः खराब झाल्याचा दावा एनएसयूआयने केला आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करा
अभ्यासिकांमध्ये स्वच्छता, सांडपाण्याची समस्या, पुरेशी पुस्तके आणि इतर आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. १५ दिवसांत सर्व समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा आशिष बोंडे यांनी दिला.

पत्रकार परिषदेला मनीष दास, सचिन हरणे आणि शुभम रत्नपारखी उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular