चंद्रपूर :- आमदार सुधाकर अडबाले हे निवडून आल्यापासूनच जुनी पेंशन योजना, टप्पा अनुदान, आश्वासित प्रगती योजना, वेतन तसेच वरिष्ठ महाविद्यालय, आयटीआय, आश्रमशाळेतील प्रश्न सतत सभागृहात मांडत असतात. केवळ प्रश्नांची मांडणी न करता ते प्रत्यक्ष धोरणात्मक निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करतात, हा त्यांचा कार्यरचनात्मक दृष्टिकोन शिक्षकांसाठी दिलासादायक ठरत आहे. गेल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातच त्यांनी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने त्यांचे हे शिक्षकांप्रती कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांनी व्यक्त केले. MLA Sudhakar Adbale’s “Sudhakarparva” Special Issue Launch Ceremony
शिक्षकांच्या हक्कांसाठी लढणारे कणखर नेतृत्व, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या विधिमंडळ कार्यकाळातील केलेल्या कार्याचा आढावा घेणारा “सुधाकरपर्व” विशेषांक (पुस्तक) प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात सोमवारी पार पडला. याप्रसंगी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आमदार व्ही. यू. डायगव्हाणे पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. विधान परिषदेत आणि विविध प्रशासकीय स्तरावर शिक्षकांची बाजू भक्कमपणे मांडत त्यांनी अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत.
अनेक लोकप्रतिनिधींकडे केलेल्या कामांचे प्रकाशन करायला काहीच नसते. मात्र, आमदार अडबाले यांनी गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सभागृहातील कामांचा हिशोब “सुधाकरपर्व” या पुस्तकाच्या माध्यमातून देत आहेत, ही त्यांची जमेची बाजू असल्याचे श्री. दिलीप कडू यांनी सांगितले.
चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार सुधाकर अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त या पुस्तिकेचे प्रकाशन माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, सौ. सीमा अडबाले, महामंडळ उपाध्यक्ष जगदीश जुनगरी, लक्ष्मणराव धोबे, श्री. रोडे, श्याम धोपटे, विजय टोंगे, विमाशि संघाचे वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, मारोतराव अतकरे, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, विजय भोगेकर व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रकाशन सोहळ्याचे संचालन विमाशि संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी यांनी, प्रास्ताविक हितेश गोहोकार तर आभार जिल्हा कार्यवाह सुनील धोपटे यांनी मानले.
सोबतच वाढदिवसानिमित्त आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, ॲड. संजय धोटे, नगराध्यक्ष अल्का अनिल वाढई, नगराध्यक्ष निलेश ताजणे, चंद्रपूर उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शिवा राव, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कुंदा जेनेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार तसेच नगरसेवक, विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विमाशि संघाचे प्रांतीय, जिल्हा, तालुका पदाधिकारी, सदस्य यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
