अखेर मोकाट अस्वल जेरबंद!
नागभीड रेल्वे कॉलनीत वनविभागाची तब्बल ६ तास मोहीम; दुपारी ३.५४ वाजता कारवाईला यश
चंद्रपूर :- चंद्रपूर टुडे न्यूज :- नागभीड रेल्वे कॉलनी परिसरात मागील काही काळापासून नागरिकांच्या नजरेस पडणाऱ्या मोकाट अस्वलाला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेल्या मोहिमेला दुपारी ३.५४ वाजता यश आले आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अस्वलाच्या सततच्या वावरामुळे रेल्वे कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने मोहीम आखली. वनपरिक्षेत्र अधिकारी भारती वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.
या मोहिमेत वनसंरक्षक एम. बी. गायकवाड (ब्रह्मपुरी वनविभाग), डॉ. रविकांत खोब्रागडे (चंद्रपूर) आणि शूटर अजय मराठे सहभागी झाले. तसेच एम. पी. तावडे, क्षेत्र सहाय्यक मिंडाळा, ए. के. मसराम, क्षेत्र सहाय्यक नागभीड आणि डी. जे. मैंद, वनरक्षक म्हसली यांच्यासह वनविभागाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
अनेक तासांच्या प्रयत्नांना अखेर यश
अस्वलाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून वनविभागाच्या पथकाने मोहीम पुढे नेली. अखेर दुपारी ३.५४ वाजता अस्वल जेरबंद करण्यात आले. कारवाई यशस्वी होताच रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
नागरिकांना वनविभागाचे आवाहन
मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाऊ नये, पाठलाग करू नये किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. वन्यप्राण्याचा वावर आढळताच तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.