Start NAT testing in district hospitals across Vidarbha
चंद्रपूर :- पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष श्री. हंसराज अहीर यांनी दि. २३ जून २०२६ रोजी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसेच भाजपाचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जगत प्रकाश नड्डा यांची शिष्टाचार भेट घेतली. या भेटीत विदर्भातील आरोग्यविषयक व जन-कल्याणाशी निगडित अनेक महत्वपूर्ण विषयांवर सविस्तर आणि सार्थक चर्चा करण्यात आली. या महत्वपूर्ण भेटी प्रसंगी प्रमुख वैद्यकीय तज्ञ डॉ. व्ही. पी. चौधरी, डॉ. जे. एस. अरोरा आणि डॉ. एन. के. मेहरा यांचेसह श्यामल अहीर हे उपस्थित होते.
थॅलेसीमिया, सिकल सेल अॅनिमिया आणि हीमोफीलिया सारख्या रक्तविकारांच्या गंभीर रुग्णांसाठीच्या जीवनरक्षक औषधींना GST मुक्त करण्याची आग्रही मागणी श्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केली. या करमुक्तीमुळे गोरगरीब रुग्णांच्या कुटुंबियांवर येणारा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी करणे शक्य होईल असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
थॅलेसीमिया आणि हीमोफीलिया या गंभीर आजारांबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक विशेष ‘राष्ट्रीय दिवस’ घोषित करण्याचा आग्रह श्री अहीर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत धरला.
संबंधित रुग्णांना सुरक्षित रक्त ट्रान्सफ्युजन उपलब्ध व्हावे यासाठी देशभरातील सर्व ब्लड बँकांमध्ये NAT (Nucleic Acid Testing) प्रणालीचा वापर करून या प्रणालीचा प्रसार आणि अंमलबजावणी करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
सिकलसेल रुग्णांसाठी विदर्भातील सर्व जिल्हा रुग्णालयात
NAT टेस्टिंग अनिवार्य करण्याची मागणी
विदर्भात, विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये सिकलसेल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये NAT टेस्टिंग अनिवार्य करण्याची मागणी श्री. अहीर यांनी या भेटी दरम्यान केली. NAT टेस्टिंगमुळे रक्त संक्रमणाचा धोका कमी होऊन रुग्णांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील असेही अहीर यांनी चर्चा करताना सांगितले.
यापूर्वी चंद्रपूर मेडिकल कॉलेज सुरु करण्याची परवानगी आपल्याच कार्यकाळात देण्यात आली होती याचे स्मरण करतानाच आपल्या माध्यमातून वैदर्भीय आरोग्य यंत्रणा अधिक गतिशील व रुग्णाभिमुख होईल अशी भावना व्यक्त करून श्री. अहीर यांनी चंद्रपूर मेडिकल कॉलेजला तसेच चंद्रपुरातील ICMR (Indian Council of Medical Research) केंद्रास भेट देण्याचे निमंत्रण माननीय श्री. नड्डा यांना दिले. या भेटीमुळे विदर्भातील सिकल सेल, थॅलेसीमिया आणि हीमोफीलिया सारख्या आजारांच्या संशोधन, उपचार आणि नियंत्रणाला मोठी गती मिळेल असेही अहीर यांनी मंत्रीमहोदयांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व प्रस्तावांवर सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व मागण्यांबाबत सखोल विचार तसेच आवश्यक माहिती घेऊन शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. अहीर यांना दिले. ही भेट आरोग्य क्षेत्रातील सुधारणांना, विशेषतः विदर्भातील सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.