‘Chhatron Ki Goonj’ Youth Conference to Give Voice to Students’ Issues
चंद्रपूर :- देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होत असलेल्या पेपरफुटीच्या घटना, भरती प्रक्रियेमधील विलंब, बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्यांविरोधात विद्यार्थी आणि युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी “छात्रों की गूंज – युवांच्या समस्यांचे संमेलन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘Chhatron Ki Goonj’ Youth Conference
विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित हे संमेलन २७ जून रोजी दुपारी १ वाजता CDCC बँक हॉल, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत NEET, UGC-NET, MPSC, SSC-CGL, रेल्वे भरती परीक्षा यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. तसेच अनेक भरती प्रक्रियांमध्ये होणारा विलंब, निकाल जाहीर करण्यास लागणारा कालावधी आणि नियुक्त्यांमधील अडथळे यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ संमेलनात विद्यार्थी आणि युवकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली, पेपरफुटीवर कठोर कारवाई, वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उपलब्धता, रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच युवकांना प्रभावी करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी सामूहिक भूमिका निश्चित केली जाणार आहे.
संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून युवकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“आमची परीक्षा सुरक्षित असावी, भरती प्रक्रिया पारदर्शक असावी आणि प्रत्येक युवकाला रोजगाराचा न्याय्य अधिकार मिळावा” या प्रमुख मागण्यांसह युवकांचा एकत्रित आवाज या संमेलनातून उमटणार आहे.
“जब युवा जागेगा, तभी भविष्य बदलेगा” या घोषवाक्याखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक आणि युवक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक प्रतिनिधी, नागरिक, समाजाचे प्रतिनिधी आणि प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांनी केले आहे.
