Implement a permanent solution to Chandrapur’s traffic congestion through a ring road
मुंबई / चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या आणि नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) मार्गाची तातडीने निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. Implement a permanent solution to Chandrapur’s traffic congestion
यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा कोळसा, सिमेंट, वनसंपदा आणि विविध उद्योगांमुळे राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक जिल्हा आहे. मात्र, शहरातून जाणाऱ्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा स्वतंत्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने संपूर्ण जड वाहतूक चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातूनच जात आहे.
त्यांनी सांगितले की, बाबूपेठ, बंगाली कॅम्प, रामनगर, वरोरा नाका आणि पडोली या मार्गांवर दिवसेंदिवस वाहनांचा प्रचंड ताण वाढत असून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. या मार्गांवर वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका, व्यापारी तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर शहराला या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान स्वतंत्र रिंगरोड (बायपास) उभारणे हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सभागृहात सांगितले. या संदर्भात सातत्याने मागणी करूनही शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस आणि निर्णायक कारवाई झालेली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
शासनाने या प्रस्तावाला प्राधान्य देत आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर स्वतंत्र रिंगरोडच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
चंद्रपूरच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
